मराठी -१ | Marathi-1
]
Marathi मराठी -१
नमस्कार.
भारतीय लोकांना आपल्या संस्कृती बद्दल सार्थ अभिमान आहे. आपल्या इतिहासाची गौरवपाने वाचताना आपल्या प्रदेशाची आपल्याला पुनः ओळख होते. आपण कोण, आपला देश आणि आपले लोक म्हणजे काय, आपल्या परंपरा कशा घडल्या, या सर्वांची संगती कशी लावावी याची जाणीव होते. लहानपणापासून वाचायला मिळालेल्या साहित्यामुळे आणि माहिती मुळे ही ओळख दृढ होते.
आपल्या ओळखीचा एक अतिमहत्वाचा भाग ही आपली भाषा होय. मराठी भाषेला शेकडो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. महाराष्ट्र सरकारने केलेल्या तज्ञ शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार मराठीचा इतिहास सिंधू संस्कृतीच्या काळापर्यंत पोचतो, आणि ती आद्य प्राकृत भाषा आहे. यातील लिखाण अगदी १५०० वर्षांपासून मिळते, आणि आपल्याला ओळखीची वाटेल अशा मराठी भाषा प्राचीन शिलालेखांत साधारण ६०० वर्षांपूर्वीपासून आढळते.
मराठी ही एकच, सर्वसामान्य भाषा नव्हे. गावा गावांतून प्रत्येक कानाकोपरा पाहिला तर भाषा बदलताना दिसतात. बोलण्याचा हेल, वापरात असलेले शब्द, उच्चार आणि इतर भाषांची सरमिसळ हे बदलतात, इतके की जरी मोघम अंदाज आला तरी कधी कधी काय बोललं गेलय याचा पूर्णपणे अर्थ कळत नाही. या बोलीभाषांतील अनुपमेय रंगबिरंगी फेरकाव्यांचे इंद्रधनुष्य मोहक असते, आणि आपल्या जगण्याला वेगळा आयाम देते.
भारतात २२ सरकारी कामाच्या भाषा आहेत, १३० पेक्षा जास्त प्रचारित भाषा आहेत आणि १५०० पेक्षा जास्त बोली भाषा आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यात रहाणारी साधारणपणे ८ कोटी मराठी जनता आपल्या भाषेचा रास्त अभिमान बाळगते आणि संवेदनशील आहे. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके यांच्या खपाचा आकडा दर्शनिय आहे, आणि सिनेमा / दूरदर्शन मालिका लोकप्रिय आहेत.
एखादी भाषा बोलणारे १०,००० पेक्षा थोडे लोक असतील तर भारत सरकार त्या भाषेची गणती सरकारी दफ्तरात करत नाही. त्या भाषांची गणतीच न झाल्यामुळे अशा सुमारे ६०० भाषा नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत, त्यांचा पुनरोद्धार करण्यासाठी कोणतीही योजना प्रसिद्धित नाही. इतिहास आणि संस्कृती यांना आपणाशी जोडणारा दुवा ही आपली भाषा.
संशोधनानुसार जगातील अनेक जमातींत निर्वासनामुळे, कामानिमित्त इतर भाषेंच्या अतिवापरामुळे लोक त्यांच्या भाषा हळू हळू कमी वापरतात. हळूहळू कमी वापरामुळे नवीन भाषिक तयार होत नाहीत -- मुले, नातवंडंदेखील "कशाला" म्हणून टाळतात. त्यांना शिकण्याची गरज भासली नाही तर एकाच पिढीत भाषा डबघाईला येते. अमेरिकेत वा औस्ट्रेलियात मुळच्या आदिवासी जमाती, किंवा अफ्रिकेतील अनेक गरीब जमाती जेव्हा त्यांच्या शेजारच्या धनवान जमातींबरोबर संपर्कात येतात तेव्हा आपल्या भाषा सोडून इतर भाषांचा वापर करतात.
याच्या पार्श्वभूमी वर मराठी धोक्यात आहे. आपण जितक्या जास्त प्रमाणात आज मराठी वापर चालू ठेऊ किंवा वाढवू तितके आपण मराठीला सशक्त करू, इतरांना मराठीत बोलणे सोपे करू, आणि इतरांचे मनोबल वाढवू.